जातककथाः बोधिसत्वाचा बुध्दत्वाकडे प्रवास

अरबस्थानात अरेबियन नाईटसचे जे महत्त्व तेच महत्त्व बौद्धधर्मांत जातककथांचे! सद्गुणांची कास धरल्याखेरीज धर्मतत्त्वांचा अनुभव येणे अशक्यप्रायच असे कित्येकांचे मत आहे. सिंदाबादच्या सात मुसाफिरी, अल्लाद्दीन आणि जादुचा दिवा. अलीबाबा चाळीस चोर इत्यादि गोष्टींसाठी आपण अरेबियन नाईटस् वाचत असलो तरी कष्टाळू, निर्लोभी, निर्मत्सरी वृत्ती, प्रामाणिकपणा, सचोटी, संकटांना न डगमगता अल्लावर अविचल निष्ठा इत्यादी गुण ज्याच्या अंगी असतात तोच सच्चा मुससलमान हे अरेबियन नाईटमधील गोष्टींचे इंगित आहे. जातककथांचा रोखही ह्याच प्रकारचा आहे. जातककथांचे सारगर्भ काय, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर असेच द्यावे लागेल, बोधिसत्त्वाकडून बुध्दत्वाकडे प्रवास!
गेल्या महिन्यात मी वाराणशीला गेलो तेव्हा सारनाथलाही गेलो. सारनाथ वाराणशीहून 13 किलोमीटर अंतरावर आहे. ज्ञानप्राप्ती झआल्यानंतर ह्यच ठिकाणी भगवान बुध्दाने शिष्यांना उपदेश केला. सारनाथला बुध्दाचे देखणे मंदिर उभे आहे. स्वच्छ छान आवार. तिथल्या ‘बोधिवृक्षा’खाली निरव शांतेत ध्यानस्थ बसलेल्या दोघा विदेशी बौध्दांकडे माझे लक्ष आपोआपच वेधले गेले. विशेष म्हणजे दोघेही ‘भिख्खु’ नव्हते. संसारी वाटत होते. त्यांची आणि माझी दृष्टादृष्ट होताच त्यांच्या चेह-यावर मधुर स्मितरेषा उमटल्या! मला स्वतःला क्षणभर शांतीचा अनुभव आला. त्या शांतीचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. पाच मिनीटं तेथे स्वस्थ बसलो. नंतर किंचित लवून अभिवादन करत मी तेथून काढता पाय घेतला. मी निघालो तेव्हा त्यांनीही मला स्मितहास्याने प्रतिसाद दिला!
बाहेर पडताना गेटवरच्या पुस्तकाच्या दुकानात मी शिरलो. जातककथांचे एक इंग्रजी भाषान्तराचे पुस्तक मला हवे होते. ते पुस्तक काही वर्षांपूर्वी माझ्याकडे होते. परंतु माझ्या मुलीच्या मैत्रिणीला मी ते देऊन टाकले. तीच प्रत रिप्लेस करण्यासाठी मला हवी होती. त्या पुस्तकाच्या लेखकाचे नावही मला आठवत नव्हते. खरे तर, कथा वाचणे एवढाच माझा हेतू होता. म्हणून लेखकाचे नाव लक्षात ठेवण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. ते पुस्तक मिळाले तर पाहू म्हणून मी दुकानात शिरलो. परंतु ते मला मिळाले नाहीच. आर्यशूरकृत जातकमाला नावाचे सूर्यनारायण चौधरी ह्यांनी संपादित व अनुवादित केलेले हिंदी पुस्तक मला मिळाले. घेऊन तर पाहू म्हणून मी ते घेतले खरे; पण मला ते अजिबात आवडले नाही. ओघवत्या शैलीत लिहीलेल्या रसाळ कथांना लालचावलेला मी! परंतु त्या पुस्तकाने माझी पार निराशा केली. जातकमालाचे स्वरूप एमएला अभ्यासाला लावलेल्या एखाद्या पुस्तकासारखे निघाले!
पालीत 547 जातककथा आहेत. त्या जातककथा म्हणजे बोधिसत्वापासून बुध्दत्वापर्यंतचा प्रवास कसा झाला हे गूढ गोष्टींच्या माध्यमातून समजावून सांगणे हा जातककथांचा हेतू आहे. बुध्दाच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले की त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने बुध्दाच्या पूर्वजन्मिच्या स्मृती जागृत झाल्या. बुध्दाचे वैशिष्ट्य असे की बुध्द पूर्वस्मृतींचा आणि वर्तमानकालीन प्रसंगाचा चपखल मेळ बसवत असे. पूर्वजन्मिचे हे सगळे प्रसंग म्हणजेच जातककथा! अनेक कथांचे पंचतंत्र, हितोपदेश, कथासरित्सागर इत्यादि अभिजात कथांशी साम्य आहे.
SBuddha Temple at Sarnath
सूर्यनारायण चौधरींच्या मते आर्यशूरच्या जातककथात मस्तिष्क आणि ह्रदय ह्या दोहोंच्या गुणांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. अर्थात आर्यशूराने सगळ्या जातककथांचा संस्कृत अनुवाद केलेला नाही. काही निवडक कथांचाच अनुवाद त्याने केला आहे. सर्नारायण चौधरींनी त्यांचे अर्थविवरण केले आहे. जातककथांचे स्वरूप उपदेशपर आहे. बोधिसत्वाच्या आधीच्या जन्मात पशु, पक्षी किंवा मनुष्य असा भेद नाही. मूळ पालीभाषेतील जातककथांचे संस्कृत, इंग्रजी, जर्मन, बंगाली, हिंदी इत्यादि भाषेत अनुवाद झाले आहेत. मराठीत जातककथांचा अनुवाद झाला आहे की नाही हे मला माहित नाही.
‘ मला राज्य नको, मला स्वर्गही नको की मोक्ष नको! मनुष्यप्राण्याचे दुःख नाहीसे व्हावे एवढीच माझी इच्छा आहे!!’ असे बुध्द म्हणतो. करूणा हेच बौध्द धर्माचे सार म्हणता येईल. कर्म अज्ञानावर अवलंबून असते तर कर्म हे जागृतीवर अवलंबून असते. जागृतीनुसार नाम आणि आकार-प्राप्ती होते. नाम आणि आकारावर सहा ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे कार्य अवलंबून असते. ह्या ज्ञानेंद्रियांवर आणि त्यांच्या कार्यावर संबध अवलंबून असते. ह्या संबंधांवरच संवेदना अवलंबून असतात. संवेदनावर इच्छा अवलंबून असतात. इच्छांतून आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीतून माणसाचे ‘असणे’ असते. त्यावरच पुनर्जन्म अवलंबून असतो. जन्मावर वार्धक्य आणि मृत्यू, दुःख, पश्चातापादि भावना, आत्यंतिक दुःख अवलंबून असतात. दुःखमुक्तीसाठी ही शृंखला खंडित होणे महत्त्वाचे!बहुतेक जातककथांत बौध्द धर्माचे हे सार आलेले आहे. जातककथांचे स्वरूप संमिश्र आहे. कुठे सरळ सरळ गद्य लेखन आहे तर मध्येच श्लोकामागून श्लोक आहेत.
जातककथांच्या मूळ पोथ्या कोलकोत्याच्या एशियाटिक लायब्ररीत आहेत. बौध्द धर्माचा आणि त्या अनुषंगाने पाली वाङ्मयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आशियातील अनेक देशांतून विद्वान भारतात येतात. परंतु भारतातले किती विद्वान तिकडे फिरकतात हा संशोधनाचा विषय आहे.
रमेश झवर

वारकरी परंपरेतले बंकटस्वामी

(सकल संत चरित्र गाथा ह्या प्रा. सौ. नम्रता भट ह्यांच्या गाथेत अनेक अधुनिक संताची चरित्रे दिली आहेत. ह्या गाथेत आधुनिक तसेच प्राचीन दोन्ही काळातील तपशीलवार परंतु थोडक्यात चरित्रे दिली आहेत. बंकटस्वामी हे जोगमहाराजांचे शिष्य. जोगमहाराजांनंतर बंकटस्वामींनी आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदाची धुरा स्वीकारली. मामासाहेब दांडेकर ह्यांचे ते समकालीन होते.)

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात निनगूर नावाच्या एका लहानशा खेडेगावातील रजपूत घराण्यात बंकटस्वामींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव न्याहालसिंग तर आईचे नाव रत्नादेवी. बंकटस्वामींच्या वेळी रत्नादेवींना खूप त्रास झाला म्हणून कुलदैवत व्यंकटेशाला नवस केला. व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नाव बंकटसिंग ठेवले. बंकटसिंग मोठा होऊ लागला. पण तो उभाच राहिना. त्यासाठी त्याच्या आईवडिलांनी अनेक निरनिराळे उपाय केले आणि अखेरीस तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे तुका म्हणे भोग सरे। गुण येती अंगारे। त्याच्या पायात हळूहळू ताकद येऊ लागली. बंकटनी उत्तर आयुष्यात भागवत धर्माच्या प्रचारार्थ जी पायपीट केली अथवा पाच पाच तास अभे राहून लोकांना किर्तनाव्दारे द्यावयाच्या बोधामृताच्या जाणिवेमुळेच कदाचित त्यांच्या पायांनी पुर्वायुष्यात विश्रांती घेतली असावी.
लहानपणी एकदा बंकटने नदीवरील वाळूची पिंडी केली. तिची मनोभावे पूजा करून डोळे झाकून देवाचे चिंतन करीत बसला. नंतर सावध होऊन त्याने पिंडीला परत ओंजळीने पाणी घातले आणि काय आश्र्चर्य त्या महादेवाच्या पिंडीतून श्रीपांडुरंगाची मूर्ती प्रगट झाली. गावात ही बातमी वा-यासारखी पसरली. ती पांडुरंगाची मूर्तीअगदी अलीकडे पर्यंत त्यांच्या वंशजाच्या देवपूजेत होती. या बालकाने आपल्या आयुष्याच्या उषःकालीच एवढे अघटित कृत्य करून भगवत भक्तीचा वृक्ष आपल्या आयुष्यात फुलण्यासाठी देवाला आपलेसे केले. वडिलांना त्याला शिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण त्याचे लक्ष शिक्षणात नव्हते. अखेर बंकटने शिक्षण बंद केले. मग बंकटने आपल्या गावातच काही कामधंदा केला. खाजगी नोकरीत फार काम आणि टाकून बोलणे अधिक. स्वाभिमानी बंकट ते सहन करू शकत नव्हता. पुन्हा पुन्हा अपमान सहन करण्यापेक्षा वरदायी मृत्यू बरा म्हणून त्याच्या मनात आत्मघात करण्याचा विचार बळावला.
या द्रष्ट्या अलौकिक जीवनाचा अंत असा होणे हे नियतीला मान्य नव्हते. अखेर बंकटसिंग निनगूर सोडून हरिश्र्चंद्राची पिंपरी दाणापूर ही गावे हिंडत हिंडत नाशिक जिल्हयातील घोटी या गावी आले. तेथे ते एका तांदळाच्या व्यापाराकडे नोकरीला राहिले. त्या व्यापाराने आपले दुकान पुढे इगतपुरीस आणले. सुरेल कर्णमधुर आवाज त्यात ढंगदार मृदुंग वाजविणा-या बंकटसिंगाने गावातील भाविक लोकांच्यावर छाप पाडली. इगतपुरीच्या रहिवासानेच बंकटसिंगाने गुरूजींचा हात धरून ओलांडली व परमार्थाला सार्थपणे सामोरे गेले.थोर वारकरी वै. विष्णुवुवा जोग यांच्या सहवासात बंकटसिंग आले. विष्णुवुवाच्या परमार्थ प्रतिपादानाने बंकटसिंगाच्या भगवतभक्तीला एक दिशा लाभली.
त्यांनी जोगमहाराजांकडून संप्रदायाची दिक्षा घेतली. त्यांच्या साधनेला नवीन जोड मिळाली. तेथेच बंकटसिंगाना लक्ष्मणबुवा इगतपुरीकरांची पारमार्थिक संगत लाभली. त्यांनी बंकटसिंगाना देहूला पाठवले. श्रीतुकोबारायांचे दर्शन घेऊन बंकटसिंग भंडा-या डोंगरावर अनुष्ठानास गेले . त्या पुण्यापावन भूमीत व शांत निरामय जागेत बंकटने आपली ईश्र्वरोपासना सुरू केली. ज्ञानेश्र्वरी, भागवत व तुकाराम गाथ्याची किती पारायणे केली असतील याची तर गणतीच नाही. गुरूवर्य वै. जोगांनी अशा त-हेने नानाविध प्रकारची सेवा बंकटकडून करून घेतली. त्याचे परमार्थिक जीवन संपन्न केले. बंकटसिंगाने अधिकारी गुरूंच्या सहवासात राहून विपुल श्रवण केले आणि त्यांचे तत्वज्ञान आत्मसात केले.
तेथून पुढे मात्र त्यांनी भागवत धर्मप्रचाराची पताका खांद्यावर घेऊन गावोगावी कीर्तन-प्रवचनाव्दारे मोठे प्रभावी समाजप्रबोधन आरंभिले. वै. जोग महाराजांनी इ.स.1919 मध्ये स्थापिलेल्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी बंकटस्वामींनी निरनिराळ्या भागातून दौरे करून बराचसा निधी जमविला. नियमित आणि हमखास उत्पनाची बाब म्हणून शेतीही मिळवून दिली. पुढे 1920 साली वै. जोग महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली. स्वाभाविकच वारकरी शिक्षण संस्थेची धुरा त्या दिवसापासून बंकट स्वामींच्या शिरी अध्यक्ष या नात्याने आली. त्यांनी आपल्या भजन प्रवचनांनी अनेक लोकांची जीवने उजळली. आपण तरले आणि इतरांना तरण्याचा मार्ग दाखविला.

गीताईची कथा

(विनोबांनी विपुल लेखन केले आहे. जेवढे लेखन केले त्यापेक्षाही अधिक विधायक कार्यही केले. स्वतःच्या लेखनाबद्दल त्यांनी कधीच भाष्य केले नाही. फक्त ‘गीताई’ ही समश्लोकी गीता मात्र त्याला अपवाद आहे. अलीकडे गीतेच्या एका पानावर संस्कृत श्लोक तर बाजूच्या पानावर स्वरचित मराठी समश्लोक असलेल्या गीतेत स्वतः गीताईची कथा लिहीली आहे. गीता जयंतीनिमित्त मुद्दाम ती देत आहे. गीातईच्या असंख्य आवत्त्या प्रसिध्द झाल्या आहेत.                                                  -ज्योती झवर)

माझ्या लहानपणची गोष्ट आहे. माझी आई रोज मंदिरात कथापुराण ऐकायला जात असे. एकदा पुराणिकाची गीतेवर प्रवचने होत होती. एक दिवस पुराण ऐकून परतल्यावर ती मला म्हणाली,
“विन्या, गीता समजू शकेल असे एखादे सोपे साधे पुस्तक असेल तर ते मला आणून दे ना!”
परंतु त्या पुस्तकाने तिचे काही समाधान झाले नाही. त्यावर ती म्हणाली, “तूच का करीत नाहीस गीतेचा सरळ पद्यानुवाद ?  तू हे करू शकशील.“
आईचे हे शब्द नेहमीच माझ्या कानात घुमत, पण तेव्हा माझी अनुवाद करण्याइतकी पात्रता नव्हती.
ही 1915 सालची ही गोष्ट झाली. त्यानंतर पंधरा वर्षांनी मी ‘गीताई’  लिहिली. तेव्हा आई   नव्हती! परंतु ‘तू हे करू शकशील ‘ हा जो विश्वास तिचा माझ्यावर होता, त्याचा हा परिणाम होता! मी आईच्या प्रेरणेने गीतेचा मराठीत पद्यानुवाद केला. आई तर 1918 साली वारली आणि गीताई तयार झाली तिच्या जाण्यानंतर बारा वर्षांनी, 1930 साली.
भल्या पहाटे, निश्चित वेळी, मी गीताईच्या लेखनासाठी बसत असे. त्यावेळी गीतेशिवाय या जगात दुसरे काही आहे याचे मला भानच राहत नसे. त्या चार महिन्यांत गीतार्थाशिवाय दुस-या कोणत्याही गोष्टी माझ्या  चित्तात आल्याच नाहीत. मी स्वतःलाही विसरून हे अनुवादाचे काम करीत होतो. जेव्हा माझे हे लेखन चालू होते तेव्हा मी दुस-या जगातच होतो.
गीताई लिहिण्यापूर्वी मी गीतेचा अर्थ माझ्यापुरता निश्चित केला होता. अर्थात् तो त्या वेळेपुरताच होता. तत्पूर्वी संस्कृत,प्राकृत, इंग्रजी भाष्ये आणि टीकाग्रंथ जे हाती आले ते सगळे वाचून काढले होते- शंकराचार्य, रामानुजाचार्य, ज्ञानदेव, श्रीधर, टिळक, अरविंद, गांधी यांनी केलेल्या गीतार्थाचे सखोल अध्ययन झाले होते. गीताईत याचे प्रतिबिंब कुठे-कुठे दिसेल. मात्र ‘गीताई‘ लिहिताना खालील धोरणे डोळयांपुढे होती-
(1)गीतेचा सर्वयोगसमन्वयकारी साम्ययोगपर अर्थ नीट प्रगट व्हावा.
(2)पूर्वसूरीच्या, विशेषतः शंकर-ज्ञानदेव यांच्या, विशेष अर्थांना बाध येऊ नये.
(3)भाषांतरासारखे वाटू नये
(4)अर्थगांभीर्य कायम राखून होईल तितके सौलभ्य आणावे
(5)भाषेला निश्चित व्याकरण असावे.
(6)‘मी’ कोठेच नसावा.
गीतेचा अर्थ निश्चित करतेवेळी गीतेच्या पाचव्या अध्यायाने माझी कित्येक वर्षे खाल्ली. हा पाचवा अध्याय मोठा जटिल आहे. या ठिकाणी अर्थ लावताना एका भाष्यकाराचे दुस-या भाष्यकाराशी कुठे जमलेलेच नाही!  जोवर या अध्यायाचा मला नीट उलगडा झाला नाही तोवर मी लिहायला सुरवातच केली नाही. जेव्हा मनाची पक्की खात्री झाली की योग आणि संन्यास दोन्ही एकच आहेत आणि गीता भांडणाचा आखाडा नसून समन्वय करणारा ग्रंथ आहे. तेव्हा कुठे मी लेखनाला सुरवात केली. मी अनुवादास प्रारंभ केला तो पाचव्या अध्यायापासून.
पाचव्या अध्यायाला मी गीतेच्या प्रवेशाची किल्ली आहे असे समजतो. गीतेच्या चौथ्या अध्ययाच्या अठराव्या श्लोकात-
कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसें ।
तो बुध्दिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ।।
या श्लोकाचे मला झालेले आकलन गीतेच्या माझ्या प्रवचनांत दिसून येते .
7 आक्टोबर 1930 ला पहाटेच्या प्रार्थनेनंतर पाच वाजता मी गीताईच्या लेखनाला पाचव्या अध्यायापासून प्रारंभ केला आणि 6 फेब्रुवारी 1931 ला हे लेखन पूर्ण झाले.
आईच्या मृत्यूनंतर चौदा वर्षांनी, जून 1932 मध्ये, मी धुळ्याच्या कारागृहात असताना गीताई प्रथम प्रकाशित झाली. मी तिचे नाव गीताई – गीता+आई- असे ठेवले. आईने प्रेरणा दिली म्हणून
मला तिचे स्मरण स्वाभाविकच होते. आणि तशी गीता मातास्वरूप आहेच ! अशाप्रकारे ‘गीताई‘ बाबा ( विनोबा ) च्या आईचे स्मरण करवणारी झाली.
या गीताईला माझी प्रस्तावना नाही, परंतु सुरवातीला एक श्लोक दिलेला आहे –
गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता।
पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी।।
माझे मनोगत प्रकट करण्यासाठी हा एक शलोक पुरेसा आहे. वास्तविक भगवंताच्या वाणीला प्रस्तावनेची गरजच नाही. खरे म्हणजे गीतेच्या पुस्तकावर माझे नाव दूषणरूपच आहे, परंतु ग्रंथावर माझे नाव नसणे या युगात चालणार नसल्याने मी नाइलाजाने ते मान्य केले.
‘गीताई माउली माझी‘ हा जो श्लोक गीतेच्या आरंभी देण्यात आला तो काही काव्य म्हणून नव्हे, त्याची मला प्रत्यक्ष अनुभूती आहे. मी अनेकदा पडलो, रडलो तेव्हा या माउलीने मला आपल्या पदरात घेतलेले आहे!
गीता संसेकृतमधे असल्याने तिचे चिंतन-मनन-निदिध्यासन आजच्या जनतेला शक्य नाही. खेड्यातल्या मंडळींना संस्कृत कळत नाही. हे लक्षात घेऊन गीता मराठीत आणण्याची मला इच्छा
झाली. सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीत ती करावी अशी तीव्र इच्छा मला झाली. तसे पाहिले तर ग्रंथरचनेत मला गोडी नाही. हा जो पद्यानुवाद मी केला तो पंडितांसाठी नाही, तर ग्रामवासीयांच्यासाठी आहे. जेव्हा केव्हा माझ्या कानावर येते की अमुक गावी अमुक माणसाला गीताईने आधार दिला तेव्हा मला जे समाधान होते त्याची तुलना करता येणे शक्य नाही. एखादी उपमा देऊनही ते सांगता येणार नाही.
गीताई गीतेपेक्षा समजायला कमी कठीण आहे. असममध्ये मी पाहिले की संस्कृत गीतेपेक्षा मराठी समजायला सोपे जाते. मराठीत ‘मुक्तीत’ शब्द आहे, तर असमी भाषेत ‘मुक्तित’- फक्त हस्व-दीर्घचा फरक आहे. म्हणून, तुलसीदासांच्या रामायणाचा जसा सगळीकडे प्रसार आहे- महाराष्ट्रातही आहे, त्य़ाचप्रमाणे गीताईचाही सर्वत्र प्रचार होऊ शकतो असे मला वाटते. परंतु याबाबत माझा कोणताही आग्रह नाही.
गीतेला मी आई म्हणतो. आई या शब्दाला असलेले सारे सहचारी भाव मी गीतेत पाहतो. सर्व मायबहिणींना हा ग्रंथ उपयोगी व्हावा आणि तदव्दारा सा-या समाजाचे कल्याण व्हावे ही एकमात्र तळमळ या अनुवादामागे आहे. ‘गीताई ‘पेक्षा जास्त हिताची अशी दुसरी कोणती वस्तू मी करू शकलो नाही. स्त्रियांच्या हाती गीताई पडली तर समाजाचे किती भले होईल त्याची कल्पना मी उदाहरण देऊन समजावून शकणार नाही. घराघरात गीताई वाचली जावी, ते एक मोठे गृहशिक्षण ठरेल. ह्यादृष्टीकडे आम्ही कधी लक्षच दिलेले नाही. माताभगिनींना महत्वाच्या ग्रंथांचा परिचय आपण करून दिलेला नाही. असे असले तरी त्या आपल्या परीने शनिमहात्म्य, व्यंकटेश- स्तोत्र आदि काही ना काही वाचीत असतात. परंतु अशाने भागणार नाही. म्हणून महाराष्टात ज्यांना ज्यांना वाचता येते त्यांच्याकडे गीताई पोचायला हवी. गीताई मातृभाषेत असल्याने ऐकत असता मनात अर्थ उलगडू लागतो आणि ती हृदयाला स्पर्श करते. प्रत्येक मराठीभाषी घरात गीताई असलीच पाहिजे असे म्हणताना मला थोडा सुध्दा संकोच होत नाही. संस्कृत भाषेतल्या ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे असे कुणाला भासत नाही, इतकी त्याची सुंदर, ओघावती भाषा आहे.
गीताई छापली जात होती तेव्हा मी धुळ्याच्या कारागृहात होतो. त्यावेळी ह्या पुस्तकाची मुद्रिते तपासायला माझ्याकडे येत होती आणि ती मी तपासत होतो. त्याच काळात कारागृहात दर रविवारी माझी गीतेवर प्रवचने होत होती. जेलचे सारे वातावरण तेव्हा आध्यात्मिक भावनेने भारलेले होते. गीताईचे पहिले प्रकाशक जमनालालजी होते. गीताईची किंमत तेव्हा एक आणा (म्हणजे सहा पैसे) ठेवली गेली होती.
मला जर कुणी विचारले की तुमच्या जीवनातील सर्वांत मोठी उपलब्धी  कोणती ?  तर मी म्हणेन की ‘गीताई‘! गीताई मी जेव्हा पूर्ण केली तेव्हाच माझे जीवितकार्य एकापरीने पूर्ण झाले. त्यानंतर आता जे काही घडत आहे ते सर्व बोनसरूप समजा.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला आता सातशे वर्षे होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराज गेले, परंतु ज्ञानेश्र्वरी कायम आहे. त्याचप्रमाणे बाबा आज नाही उद्या जाईल, परंतु त्याची गीताई राहील. तिचा करता येईल तेवढा प्रचार करा. बाबाला विसरा, गीताईला आठवा. गीताई ही बाबाच्या हातून परमेश्वरी कृपेने घडलेली सर्वोत्तम सेवा असे बाबाने मानलेले आहे. गीताई माउली आहे, आई आहे. आईच्या मागे मागे सर्व मुले जातील तेव्हा काम होईल. बाबाने साम्ययोग लक्षात ठेवून गीताई लिहिली , तिचे चिंतन-मनन करा.
मला खात्री आहे की मी केलेली अन्य सेवा-कार्ये जग विसरो न विसरो, पण गीताई आणि गीता प्रवचने जग विसरणार नाही, आणि ह्या दोन कृती जगाची सेवा करीत राहतील. कारण गीताईच्या रचनेच्या वेळी आणि गीतेवर प्रवचने देताना मी केवळ समाधिस्थ होतो.

विनोबा भावे

उत्सुकता ताणून धरणारा ‘कौल’

‘कौल’ सिनेमा पाहिला. काय आहे ह्या सिनेमात? थ्रिल, सायकी, श्रुतीतला नेति नेति आदेश, आणि सद्यकालीन जगातील भिन्न भिन्न, परंतु फोलपणाने झाकोळून गेलेल्या विचारसरणी, मनाच्या ठिक-या झालेला क्षुद्र मनुष्य-जीव! पात्रे? तीन. आणि नायकाच्या आणि जीवनाचे रहस्य ज्याला समजले आहे तो म्हातारा आणि त्यांच्या सोबतीला बहुतेक वेळी हजर असलेला एकुलता एक डोंगर! ह्या सिनेमात पात्रांना महत्त्वच नाही. कथेलाही महत्त्व नाही. पटकथेचr ताकद मात्र खूपच मोठी. प्रेक्षकांना भिववून सोडणार छायाचित्रण! कोकणातल्या कुठल्याशा गावात नेमका रात्रीच्या वेळी पावसाबरोबर धिंगाणा घालणारा आवाज. हा सिनेमा सबटायटल आणि फोटोग्राफीच्या मदतीने समजून घ्यायचा. अंगावर शहारे उठले असतील तर समजायचे की आपण सिनेमा नकळत एन्जॉय करतोय्. मला वाटतं, दिग्दर्शक आदीश केळुस्करचीही बहुधा हीच अपेक्षा असावी.
‘कौल’मध्ये अंधारलेले गूढ वातावरणही आहे. पण ते ओढूनताणून आणलेले नाही. ‘वह कौन थी?’सारख्या सिनेमातले थ्रिल आहे. यशवंत रांजणकरांच्या कादंबरीतला थरार आहे. कदाचित् दिग्दर्शक आदीशला सिनेमाचे माध्यमच वाकवायचे असेल. नसेलही. हा सिनेमा खळाळणा-या नदीसारखा स्वतःचा अकृत्रिम आकार घेऊन येतो. ‘कौल’ सिनेमा सर्व रूढ आकाराला डावलून स्वतःचा आकार घेऊन आला आहे. अभिव्यक्त होण्याला महत्त्व. प्रेक्षकांना तो भावलाच पाहिजे असा अट्टहास नाही. त्याला दिग्दर्शकाच्या लेखी महत्त्व नाहीय्ये. सिनेमा माध्यमातले हे धाडसच. आदीशने ते केले आहे. वेस्ट एंड कवितेबद्दल टी. एस. इलियट म्हणतो, ह्या कवितेचा तुम्हाला समजेल तो अर्थ! आदीशचीही भूमिका जवळ जवळ तशीच आहे.

'कौल'चा दिग्दर्शक आदीश केळुस्कर
‘कौल’चा दिग्दर्शक आदीश केळुस्कर

तो मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यावरून पूर्वी भेटलेल्या म्हाता-याला भेटण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी जातो. आधी तर मी तुला भेटलोच नाही असे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याची गोची होते. परंतु हादेखील हट्टाला पेटतो. तेव्हा कुठे तो बोलू लागतो. त्या दोघातला विलक्षण संवाद प्रेक्षकांना थेट जे कृष्णमूर्ती, रजनीश, श्रुतीतल्या ‘नेति नेति’ इत्यादि नाना विषयांपर्यंत घेऊन जातो. काय सत्य आणि काय सत्य नाही ह्याबद्दल शंकांचे काहूर माजावे असा हा दोघांचा संवाद. बराचसा एकतर्फी. आदीशने तो ताकदीने लिहलाय्! कथा म्हणाल तर एवढीच.
ह्या कथेला रूढ अर्थाने कथाही म्हणता येत नाही. मग आदि, मध्य किंवा अंत शोधण्याचा प्रश्नच नाही. ती थेट सुरू होते. 25-30 मिनीटे प्रेक्षकांच्या मनात भिनत जाते. नंतर टोकदार उत्सुकता  वाटू लागते, काय शेवट होणार  आहे ह्याचा?       म्हाता-याच्या तोंडची संवादांची फेक क्वचित प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणाराही असतो. ऑडिओ व्हिज्युअल माध्ममातला हा ऑडिओ ऐकता ऐकता प्रेक्षकांना देवाचे विश्वरूप पाहण्यासाठी कृष्णाकडे दिव्य दृष्टी मागणा-या गीतेतल्या अर्जुनाची आठवण व्हावी. हिंदीत साँगलेस सिनेमे निघाले. समान्तर सिनेमांची तर मोठी चळवळ उभी झाली. उभी राहिली तशी संपलीदेखील. ‘यादे’सारखा एकपात्री सिनेमाही निघाला. मराठी रंगभूमी तर प्रयोगासाठीच ओळखली जाते. मराठी सिनेमा मात्र प्रयोगासाठी फारसा ओळखला गेला नाही. ‘कौल’ सिनेमा मात्र प्रयोगाच्या दिशेने निघाला आहे असे वाटते. प्रत्येकाने पाहावा असा हा सिनेमा.
रमेश झवर

मसाज विद्या

(मेंदूतून निघणा-या ज्ञानतंतूंचे आणि स्नायूंचे शरीरातील शेवटचे आणि दुसरे केंद्र हे गुदव्दारापाशी आहे. सदैव होणा-या, अविरत होणा-या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, प्रासंगिक आणि अप्रासंगिक क्रियांमुळे मेंदूवर अतोनात ताण येतो, दाब, दडपण येते आणि त्याचा परिणाम ज्ञानतंतूच्या आणि स्नायूंच्या विकारांमध्ये होतो. हे रामाच्या मसाज तंत्राचे तत्वज्ञान होते, आधारभूत पाया होता. मेंदूला आलेला शीण, मेंदूतून ज्ञानतंतूंमध्ये किंवा स्नायूंमध्ये उतरलेला शीण, थकवा, ताण-तणाव घालवणे हे रामच्या मसाज प्रक्रियेचे मुख्य तंत्र होते आणि या तंत्राचा मंत्र होता तो म्हणजे थकलेल्या ज्ञानतंतूंवर आणि स्नायूंवर हळुवार फुंकर घालणे. ही फुंकर घालण्याची प्रक्रिया म्हणजे मसाज… वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवणारे राम भोसले ह्यांच्या अद्भूत चरित्रावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले धनंजय देशपांडे ह्यांनी लिहीलेल्या कादंबरीतील एका प्रकरणाचा हा गोषवारा! न्या. देशपांडे हे ज्ञानेश्र्वरीचे अभ्यासक आहेत. राम भोसले ह्यांनी महात्मा गांधी, नेहरू ह्यांच्यासारख्या भारतातल्या नेत्यांवर मसाज उपचार केलेच. त्यांची कीर्ती इतकी पसरली की इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादि अनेक देशातल्या नेत्यांनी त्यांना मसाज उपचार घेण्यासाठी पाचारण केले -पेजएडिटर ज्योती झवर )/strong>

मसाज विद्या

मसाज ही तीन देशांतून शिकून आला म्हणून रामची मसाज पध्दती पाश्र्चात्य नव्हती. ती संपूर्ण भारतीय होती आणि अनुभवांची जसजशी समृध्दी होत गेली तसतशी रामने त्यांत अनेक सुधारणा केल्या,
भर टाकली. शेवटी ती रामचीच एक स्वतंत्र मसाज पध्दती झाली. मसाज म्हणजे अंग रगडणे, मसाज म्हणजे घोड्याला खरारा करतात तसे शरीर सामर्थ्याने चोळणे, मसाज म्हणजे घामाघूम होणे या संकल्पनांना रामने पूर्ण फाटा दिला. मसाजमध्ये तेलाचाही वापर करायलाच हवा हा संकेत अणि परंपराही त्याने तोडून टाकली.
संपूर्ण शरीर हे संवेदनामय आहे, चैतन्ययुक्त आहे आणि मेंदू हे संवेदनांचे व चैतन्याचे केंद्र आहे. मेंदूतून ही संवेदना ज्ञानतंतूंच्याव्दारे सा-या शरीरात पोचविली जाते व हे वहनाचे कार्य मेरूदंडातून म्हणजे पाठीच्या कण्यातून होते. पाठीच्या कण्यातून ज्ञानतंतूंसोबत मोटर नर्व्हजसुध्दा सा-या शरीरात पसरल्या आहेत.
मेंदूतून निघणा-या ज्ञानतंतूंचे आणि स्नायूंचे शरीरातील शेवटचे आणि दुसरे केंद्र हे गुदव्दारापाशी आहे. सदैव होणा-या, अविरत होणा-या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, प्रासंगिक आणि अप्रासंगिक क्रियांमुळे मेंदूवर अतोनात ताण येतो, दाब, दडपण येते आणि त्याचा परिणाम ज्ञानतंतूच्या आणि स्नायूंच्या विकारांमध्ये होतो. – अर्थात या विकारांमध्ये अपघातांतून निर्माण होणा-या विकृतींचा समावेश नाही. हे रामाच्या मसाज तंत्राचे तत्वज्ञान होते, आधारभूत पाया होता. मेंदूला आलेला शीण, मेंदूतून ज्ञानतंतूंमध्ये किंवा स्नायूंमध्ये उतरलेला शीण, थकवा, ताण-तणाव घालवणे हे रामच्या मसाज प्रक्रियेचे मुख्य तंत्र होते आणि या तंत्राचा मंत्र होता तो म्हणजे थकलेल्या ज्ञानतंतूंवर आणि स्नायूंवर हळुवार फुंकर घालणे. ही फुंकर घालण्याची प्रक्रिया म्हणजे मसाज.
म्हणून रामचा मसाज म्हणजे बोटांचं कोमल नर्तन, त्या नर्तनात ताल होता, तोल होता, लय होती, हळुवारता होती आणि त्या नर्तनातून निघणारी स्पंदनं सा-या शरीरात पसरतील, थोड्याच वेळात सारं शरीर स्पंदनांनी भारलं जाईल व त्या स्पंदनशक्तीतून मेंदूला आराम मिळेल व ज्ञानतंतू व स्नायूंचा शीण, थकवा जाईल हे शास्त्र त्यामागे होते. केवळ भारतीयांचा एकाधिकार असलेला कुंडलिनीयोग हा या स्पंदनांचे जागरण, क्रेंद्रीकरण आणि स्वेच्छाधीनता यांवर अवलंबून आहे. ती स्पंदने सुध्दा मेरूदंडात निर्माण होतात, एकेका चक्राला जागं करत जातात आणि त्या स्पंदनांच्या अतिविलक्षण गतीमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होत असते.
एरवी सुध्दा मानवी शरीर नित्य स्पंदित होत असते. शरीरातील विद्युत शक्ती ही स्पंदनांच्या व्दारेच विखुरते व शरीराला क्रियान्वित करते. पण आपल्याला स्पंदनांचा केवळ विनियोग माहीत आहे व त्या अखंड विनियोगामुळे मेंदूला थकवा येतो हे आपल्याला माहीत नाही. त्याचप्रमाणे स्वेच्छेने शरीरात हवं त्या ठिकाणी आपण स्पंदने निर्माण करू शकत नाही. पाठ आणि पर्यायाने मेरूदंड हा माणसाचा युगानुयुगापासून दुर्लक्षित अवयव राहिला आहे. आपण जे काही करतो, काळजी घेतो, आरोग्याचे उपाय करतो ते सारे शरीराच्या समोरच्या भागाचे, आपल्या मागे काय घडतंय आणि काय होतंय, याकडे माणसाने नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. आपल्या ‘ पाठीमागे‘ काय जळतंय याकडे आपण कधीच पाहिलं नाही. म्हणून सारी दुखणी आपल्या ‘ पाठीमागे ‘ लागतात.
पाठ, मेरूदंड, मेरूदंडातील चोवीस मणके हेच रामच्या मसाज पध्दतीचे केंद्रबिंदू होते. अर्थात लक्षणानुसार उपचारस्थानसुध्दा बदलेल हे ओघानेच आले. आपल्या बोटातील निर्माण होणा-या स्पंदनांमध्ये जलाशयातील तरंगांचे मलयगंधित चंदनवा-याच्या झुळकांचे, खवळलेल्या समुद्रांतील लाटांचे, पिसाट वा-याचे, श्रावणातील कडाडणा-या विद्युल्लतांचे आणि यौवनगंधेच्या पायातील नूपुरांचे तरंग आले पाहिजेत अशी सिध्दी रामने प्राप्त केली होती. त्यासाठी रामने अनेक प्रकारच्या साधना केल्या. निसर्गाच्या अनेक रूपांना त्याने आपल्या जाणीवेत साठवून घेतले होते ते यासाठीच.
स्पंदनांची क्षमता समजण्यासाठी निसर्गानंतर संगीताशिवाय दुसरा कुणी मार्गदर्शक नाही, भारतीय संगीताइतकं सूक्ष्म ज्ञान आणि विद्या जगात कुठे नाही आणि कोणत्याही विद्येत परिपूर्णता कधी येत नाही हे तीन सिध्दांत रामने केव्हाच स्वीकारले होते. म्हणून जेथून मिळेल तिथून तो विद्या शिकत गेला.
-धनंजय देशपांडे

(‘दिव्यस्पर्शी’ ह्या पुस्तकातून )

प्रार्थनेची अनिवार्यता

(साबरमती आश्रमात काकासाहेब कालेलकर हे गांधीजींचे निकटवर्ती सहकारी होते. ते आश्रमात शिक्षक होते. सारे आश्रमवासी त्यांना मान देत असत. महात्मा गांधी तर त्यांना मान देत असतच; शिवाय कस्तुरबादेखील त्यांना खूप मान देत असत. अनेकदा कस्तुरबांना भाषण करायचे असले तर काकासाहेबांना भाषण लिहून देण्याची विनंती करत. काकासाहेब त्यांना भाषण लिहून द्यायचे. परंतु भाषणातले मुद्दे तुमचे असले पाहिजेत, ह्या अटीवरच काकासाहेब त्यांना भाषण लिहून देत. कस्तुरबांना अनेक चांगले मुद्दे सुटचायचे. काकासाहेब ते मुद्द्यात स्वतःचे मुद्दे मुळीच घालत नसत. कस्तुरबांच्या मुद्द्यावरच ते भाषण लिहून देत. –ज्योती झवर, पेजएडिटर)
प्रार्थनेची अनिवार्यता
संतांनीं म्हटले आहे ‘कांहीं पडतां जड भारी, दासें आठवावा हरिं।‘  उपदेश चांगला आहे. पण संकट येतांच मनुष्य कसा वागेल, कुणीं सांगावे?  त्या वेळीं बुध्दि काय काम करील, कोण जाणे! म्हणून संकट येवो किंवा न येवो दासें नित्य हरि आठवावा हेंच उत्तम आहे…संकट येतांच मनुष्य जर श्रीमंत असला तर तो संवयीनें आपली पैशांची थैली खोलेल, तो पैलवान असला तर लढाईच्या पवित्र्यांत उभा राहील, वकील असेल तर त्याला कायद्याचें कलम आठवेल आणि भ्याड असेल तर पळ काढील…प्रत्येक जण आपापल्या शक्तीप्रमाणें वागेल. त्याचप्रमाणें मनुष्य श्रध्दाघन असेल तर संकट येतांच तो प्रार्थनेंत प्रवेश करील व ईश्वराकडून बळ प्राप्त करून घेईल. .. प्रार्थनेचा हा उपयोग आहे. प्रार्थनेच्या निमित्तानें जीवनाचें व जीवनस्वामीचें चिंतन तर होतच असतें. पण नैतिक किंवा आध्यात्मिक संकट येऊन कोसळलें म्हणजे तोंडांतून लगेच ईश्वराचेंच नांव निघेल आणि तें आपलें काम करील. …नित्य प्रार्थनेचा- विशेषत: सामुदायिक प्रार्थनेचा- हा लाभ आहे…
आणि नंतर काकासाहेबांनीं एक संस्मरण सांगितलें. म्हणाले, “एकदां मी व महादेवभाई गांधीजींचें जीवन व नरसिंह मेहतांचें ‘वैष्णव जन तो तेंणे कहिये ‘ हें भजन- यांची तुलना करीत बसलों होतों. महादेवभाई म्हणाले, ‘वैष्णवजनां‘चीं अनेक लक्षणें गांधींजींच्या जीवनांत पूर्णपणें प्रगट झालीं आहेत. फक्त ‘रामनाम शुं टाळी रे लागीं ‘ एवढें पूर्णपणें प्रगट झालेलें नाहीं असें मला प्रथम वाटत असे. पण आतां पहातों कीं त्यांची साधना वाढली आहे व तेंहि लक्षण त्यांच्यांत अधिकाधिक प्रगट होऊं लागलें आहे.’ मी म्हणालों,  ‘आपल्या येथें भक्त लोकांमध्यें कधींकधीं नामसंकीर्तनाचा एवढा कैफ चढूं लागतो कीं मनुष्य बघतां बघतां ‘धर्मध्वजी ‘ बनून आपल्या भक्तीचें प्रदर्शन करण्यात आनंद मानूं लागतो. हा एक दोष आहे. संयमघन बापूजी आपली नामसाधना प्रगट करूं पहात नसावेत. पण त्यांची नामसाधना उत्कट होत चालली आहे हें मीं त्यांचा चेहरा पाहून सांगूं शकतो. ….”
आणि काकांसाहेबांनीं म्हटलें, “बापूजींची साधना किती तीव्रतेनें चालत होती व त्यांची प्रगति किती झपाट्यानें होत चालली होती हें त्यांचे निरनिराळ्या वेळचे फोटो पाहून सांगतां येतें…गांधीजींचे जे जुने फोटो मला त्या वेळीं यथार्थ वाटायचे ते आज मला फिके वाटतात. ते गांधीजींना संपूर्णत: व्यक्त करीत नाहींत असा मनांत थोडा असंतोष राहतो…गांधीजी जसजसे आंतरिक प्रगति करीत गेले तसतसा त्यांच्या चेह-यांत देखील फरक पडत गेला…..”
मी म्हणालों,” जवाहरलालजींनीं म्हटलें आहे: As he grew older his body seemed to be just a vehicle for the mighty spirit within him. Almost one forgot the body as one listened to him or looked at him, and so where he sat became a temple and where he trod was hallowed ground.”
काकासाहेब म्हणाले, “ बरोबर आहे .“
रवींद्र केळेकर
(ज्ञाननिधीच्या सान्निध्यात ह्या रवींद्र केळेकर ह्यांच्या पुस्तकातून)

उपेक्षेच्या पलीकडे

(काकासाहेब कालेलकर हे मराठी असले तरी गुजराती लेखक म्हणून ख्यातकीर्त आहेत. त्यांना महात्मा गांधींनी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमधून साबरमती आश्रमात आणले. अर्थात रवींद्रनाथांकडे त्यांनी आधी विषय काढला आणि नंतर काकासाहेबांना साबरमती आश्रमात येण्याची विनंती केली. काकासाहेबांना साबरमती आश्रमात गांधींचा प्रदीर्घ काळ सहवास लाभला. गांधींजींबद्दलच्या त्यांच्याकडे आठवणींचा भांडार होता. त्या आठवणींचे शब्दांकन सुप्रसिध्द लेखक रवींद्र केळेकर ह्यांनी केले आहे. जागतिक पातळीवर योगदिन साजरा व्हायला सुपूवात झाल्यापासून सध्या योगाचा बोलबाला जोरात सुरू आहे. परंतु ख्रिश्चन संत योगातील तत्त्त्वांच्याही पलीकडे गेल्याचे एक उदाहरण काकासाहेबा कालेलकरांनी प्रार्थनासभेत सांगितले. रवींद्र केळेकर ह्यांनी ते शब्दबध्द केले आहे. –ज्योती झवर, पेजएडिटर)
उपेक्षेच्या पलीकडे
येथॆ “ सन्निधि “ मध्यें साडेसहाला रोज सामुदायिक प्रार्थना होत असते. प्रार्थनेनंतर काकासाहेब प्रवचन करीत असतात. गेल्या मंगळवारपासून त्यांनीं प्रवचनासाठीं गीतेचा 12 वा अध्याय घेतला आहे.
आज सकाळच्या प्रवचनांत ते म्हणाले, “ मैत्री, मुदिता, करूणा व उपेक्षा या योगशास्त्रांत सांगितलेले चार आर्य सद्भाव असणें ही मैत्री. दुस-याची सुस्थिति पाहून आनंद होणें ही मुदिता. दुःखी लोकांविषयीं करूणा आणि दुष्टांच्या बाबतींत उपेक्षा. हे चार गुण ‘ आर्य‘ सद्गुण म्हणून ओळखले जातात. पण यांत जो शेवटचा सद्गुण ‘उपेक्षा‘ आहे त्याच्या पलीकडे आतां आपल्याला गेलें पाहिजे. आतां दुष्टांविषयीं उपेक्षा बाळगून उपयोगाचे नाही. दुष्टांची दुष्टता नष्ट व्हावी म्हणून आपण प्रयत्न करीत राहिलें पाहिजे. ख्रिस्ती मिशन-यांमध्यें असे कांहीं सत्पुरूष होऊन गेले कीं, ज्यांनीं दुष्टांची दुष्टता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तुम्हीं प्रेमाग्रही म्हणा, सत्याग्रही म्हणा किंवा आस्तिकतेचे आग्रही म्हणा. पण ते मानवजातींतील अत्यंत श्रेष्ठ पुरूषांपैकीं आहेत…..”
आणि त्यांनीं एक गोष्ट सांगितली : “आफ्रिकेंतील एका जंगलांत एक मिशनरी धर्मप्रसारासाठीं गेला. जंगलांतील लोक सर्व नरभक्षक. तरीहि त्यानें तेंच स्थान पसंत केलें. लोकांना भेटून त्यांना तो चर्चमध्यें बोलवूं लागला. कांहीं लोक येऊं लागले. त्यांच्यापुढें तो प्रवचनें करायचा. त्याच्या प्रवचनांना रोज एक जोडपें येत असे. एके दिवशीं यापैकीं स्त्री आली नाहीं. केवळ पुरूष आला. मिशन-यानें त्या पुरूषाला विचारलें, ’आज बायको कां आली नाही? कुठे आहे ती?’ त्यानें उत्तर दिलें ‘माझ्या पोटांत.’ मिशन-याच्या लक्षांत कांहीं आलें नाहीं. त्यानें पुन्हां विचारलें, ‘आजारी आहे?’ त्यानें उत्तर दिलें, ‘ खाऊन टाकली.‘ मिशन-याला सहन झालें नाहीं. पण करणार काय? शांत राहिला. त्यानें त्याची निंदाहि केली नाहीं. त्याला पापीहि म्हटलें नाहीं. धर्मबोध करीत राहिला. ब-याच दिवसांनंतर मिशन-याच्या प्रेमानें तो इसम प्रभावित झाला. त्याला त्याची चूक कळली. तो मिशन-यापाशीं येऊन रडायला लागला….म्हणाला, ’ ‘ मी फार मोठें पाप केलें. आता काय करूं? ‘ मिशनरी म्हणाला, ईश्र्वर कृपाळू आहे… येशूची प्रार्थना कर. तो तुझ्या वतीनें देवाशीं क्षमायाचनाकरील’….”
ही गोष्ट सांगून काकासाहेब म्हणाले, “ अशा वृत्तीने ज्या लोकांनीं काम केलें त्यांना तुम्ही काय म्हणाल? ते मांस खात असतात म्हणून त्यांना पामर मानाल? हे लोक उपेक्षेच्या पलीकडे गेलेले श्रेष्ठ संत आहेत.”
रविंद्र केळेकर
(काकासाहेब कालेलकर ह्यांच्याशी केलेल्या संवादावर आधारित ‘ज्ञाननिधीच्या सान्निध्यांत’ ह्या पुस्तकातून)